Baramati loksabha : बारामती अजितदादा गटाला सोडणार का? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टचं सांगितलं, राजकारणात..

दौड, (सुमित सोनवणे, प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा करत एकप्रकारे प्रचाराचा शुभारंभ केला आहे. मी देईल तो उमेदवार निवडून द्या, असं आवाहन अजितदादांनी बारामतीकरांना केलं आहे. अशात बारामती लोकसभा मतदार संघाबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

बारामतीबद्दल अद्याप निर्णय नाही : चंद्रकांत पाटील
बारामती लोकसभा मतदारसंघात परिस्थितीनुरूप बदल होतील. पण उमेदवारी संबंधी निर्णय झालेला नाही, असे वक्तव्य दौंडमध्ये राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात कृषी महोत्सव 2024 चे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

बारामती मतदारसंघात भाजपऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून सुनेत्रा अजित पवार यांचे नाव पुढे येत असल्याबद्दल विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘राजकारण हे नेहमी प्रवाही असते. जसा पाण्याचा प्रवाहाच्या मध्ये अडसर आला नाही तर ते अतिशय शुध्द राहते. अडसर आला तर त्याचं गटार होते. त्यामुळे राजकारण देखील प्रवाही ठेवावे लागते. तुम्ही जर अडून राहिला तर राजकारण होत नाही. बारामतीमध्ये परिस्थितीनुरूप बदल होतील. पण अजून निर्णय झालेला नाही, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी दौंडमध्ये केलं आहे.

अजितदादांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन
अजित पवार यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवरुन शरद पवार गटाच्या नेत्यांना लक्ष्य केले. तसेच आगामी काळात बारामतीचा विकास करायचा असेल तर महायुतीचा उमेदवार निवडून येणे, कसे महत्त्वाचे आहे, पटवून देण्याचा प्रयत्न मतदारांना केला. आपण नुसते सेल्फी काढत फिरत नाही. कामे करण्याचा आपल्याला आवाका आहे. मी आणि माझा परिवार सोडला तर बारामतीमध्ये सगळेजण माझ्याविरोधात प्रचार करतील. इतरांसाठी एवढं करून मला एकटे पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी मला तुम्हा कार्यकर्त्यांची साथच आहे. तुमची साथ आहे तोपर्यंतच मी तडफेने काम करु शकतो, असे भावनिक आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.

वाचा –
‘आम्ही हक्काचा भाऊ घालवला’, सुप्रिया सुळे कुणाच्या आठवणीत इमोशनल?

पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
अजित पवार यांनी आपल्या भाषणातून बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. अजित पवार यांनी म्हटले की, संसदेत नुसती भाषण करुन प्रश्न सुटत नाही. मी फक्त मुंबईत बसून भाषणं करून इथली कामे झाली असती का? संसदरत्न पुरस्कार मिळवून कामे होत नाही. काही जण सांगतील वर आम्हाला द्या, खालची निवडणूक आहे त्यांना मतं द्या. पण माझ्या उमेदवाराला डाग लागला तर राज्यात आणि देशाच्या राजकारणात माझी किंमत कमी होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.

Source link