मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खार ‘एच -पश्चिम’ परिसरात पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवर 600 मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी 16 व 17 फेब्रुवारी रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे मुंबई महापालिकेने कळवले आहे. त्यामुळे पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा
16 व 17 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवर 600 मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन दिवसात एच पश्चिम विभागातील पाली गाव, नवी कांतवाडी, शेरली राजन, च्युईम गाव, पाली पठार झोपडपट्टी, डॉ. आंबेडकर मार्ग लगतच्या झोपडपट्टया, गझधर बंध भाग, दांडपाडा, 16 वा रस्ता व 21 वा रस्ता यांच्यातील खार पश्चिमेचा भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरु होईल.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
या दोन दिवसात पाणी कमी दाबाने सोडले जाणार असल्याने अनेक उंच इमारतीत पाणी पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 नंतर एच पश्चिम प्रभागाचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल. संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया याची नोंद घ्यावी आणि पाणी जपून वापरावे व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.
वाचा –
एवढं स्वस्त कुठंच नाही, चक्क किलोवर मिळतायेत कपडे, चिंधी मार्केट माहितीये का? Video
मुंबईवर पाणी कपातीचं संकट
120 किलोमीटर अंतरावरून मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20 दिवसांचा पाणीसाठा कमी असल्याने मुंबईला जलसंकटाची चाहूल लागली आहे. एप्रिल-मे महिन्यात पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने मे महिन्यात पाणीबाणी परिस्थितीची चिंता पालिकेला सतावत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.