पुणे, वैभव सोनवणे, प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी पुण्यात वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलेला आरोपी पळून गेल्याची घटना घडली होती. मार्शल लुईस लिलाकर असं या आरोपीचं नाव आहे. त्याला सायबर गुन्ह्यात अटक करण्यात आली होती, तसेच कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकी दिल्याचा आरोप देखील त्याच्यावर होता. ससून रुग्णालयातून फरार झालेल्या या आरोपीच्या मुसक्या पुन्हा एकदा आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.
आरोपी मार्शल लुईस लिलाकर याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी नेरळ व कर्जत येथे तपास पथके रवाना केली होती. दरम्यान आरोपी हा येरवडा येथील त्याच्या मावशीच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला. तेथे अगोदरपासूनच तैनात असलेल्या सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आता त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
शरद मोहोळच्या पत्नीला धमकावल्याचा आरोप
सोशल मीडियावर रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना मार्शल लुईसने धमकावलं होतं. या प्रकरणी लिलाकरला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले होते. त्यावेळी तो पोलिसांच्या तावडीतून निसटून पळून गेला.
मार्शल लुईस लिलाकर पळून गेल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. दरम्यान गुंड शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी न्यायालयात पुरवणी जबाबात आपल्याला धमकावलं जात असून हत्येचे सूत्रधार मारणे आणि शेलार यांच्याकडून जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. अखेर पोलिसांनी मार्शल लुईस लिलाकर याला त्याच्या मावशीच्या घरातून तब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.