बारामतीमधून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची चर्चा; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले… – News18 मराठी

बारामती, प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमधून त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, याबाबत शरद पवार यांना विचारले असताना, लोकसभा निवडणुकीसाठी कोणीही उभे राहू शकतं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा तसेच सर्व आमदार हे पात्र असल्याचा निर्णय दिला यावर बोलताना शरद पवार यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली हे सर्वांना माहिती आहे. पक्ष, चिन्ह आमच्याकडून काढून घेतलं हा आमच्यावर अन्याय आहे. शिवसेनेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला होता, त्याचवेळी  कल्पना आली होती की, विधानसभा अध्यक्ष वेगळा निर्णय देणार नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बारामतीमधील जनता सुज्ञ आहे, आम्ही भावनिक राजकारण करणार नाही. जनता आमच्यासोबत असल्यामुळे भावनिक राजकारण करण्याची गरज नाही. आव्हाडांनी काय बोलावं याचं मार्गदर्शन कोणी करू नये, धनंजय मुंडेंपेक्षा आव्हाडांनी पक्षात अधिक काळ काम केलं, असल्याचंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.

Source link